गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांचे आमदार निवासावर आंदोलन!

नागपूर,  २० ऑक्टोबर

गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारपासून थेट आमदार निवासस्थानीच आंदोलन सुरू केले आहे.

खूप दिवसांनी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी गोसिखुर्द प्रकल्पग्रस्तांनी आता थेट नागपूरच्या आमदार निवासाचाच ताबा घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांनी काल दुपारी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित आहेत अंतर वेळोवेळो राजकारण्यांकडून आश्वासनांखेरीज लोकांना दुसरं काही मिळत नाही. त्यामुळे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील विस्थापितांनी आता हे आंदोलन आमदार भवनावरच पुकारले आहे. यावेळी संतप्त आंदोलकांकडून गच्चीवरून पाण्याची टाकी खाली टाकण्याचे व दगडफेकीचे प्रकारही घडले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाचे काही अधिकारी तिथे येऊन बच्चू कडू याच्याशी चर्चा करुन गेले. मात्र जोपर्यंत सरकार प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत आंदोलक आमदार निवासस्थानातच राहतील, असे आमदार बच्चू कडू यांनी घोषित केले आहे.

 

गोसिखुर्द प्रकल्प :

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील गोसिखुर्द सिंचन प्रकल्प सरकारने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकल्प तसाच रखडलेला आहे. या प्रकल्पामुळे प्रभावित आणि विस्थापित झालेल्या लोकांच्या मागण्या दशकांपासून प्रलंबित आहेत.

गोसिखुर्द प्रकल्प

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
१. थुटानबोरी, किन्ही खुर्द, किटाळी, जाक, भंडारा आणि उर्वरित भागातील राहिलेली जमीन नवीन कायद्यानुसार संपादित करण्यात यावी. संपादन पूर्ण होईपर्यंत पूर्ण नागरी सुविधा सुरु ठेवणे.

२. शिल्लक जमीन आणि ८ किमीपेक्षा जास्त अंतरावर विस्थापित झालेल्या भागातील सुरू असलेली वीज कपात थांबवावी.

३. वाढलेल्या जलसाठ्याने ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई.

४. २३ एप्रिल २०१८ रोजी प्रकल्पसंबंधी मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय लवकरात लवकर अंमलात आणावे.

५. वाढीव कुटुंबाची १९९७ ची लग्नाची अट शिथिल करणे आणि २०१३ मध्ये वाढीव कुटुंबांना जाहीर केलेल्या पॅकेजची पूर्तता करणे.

६. घरांचे ऐच्छिक पुनर्वसन २०१३च्या कायद्यानुसार करणे आणि गावापासून पाच किमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सोय करणे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here