घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी शासनाचा ‘स्पेशल प्रोजेक्ट’

मराठीब्रेन वृत्त

मुंबई, दि. नोव्हेंबर

घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला  आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी काल मंत्रालयात आयोजित एका बैठकीत दिली.

प्रातिनिधिक फोटो

मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर, शांतीसागर पोलीस वसाहत आणि कामराज नगर  झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी संबंधित झोपडपट्यांच्या पुनर्वसनाच्या धोरणाबाबत माहिती दिली. बैठकीत बोलताना महेता म्हणाले, “रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी जवळपास १५५ एकरावर उभी आहे. कित्येक वर्षापासून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. सन २००७ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करु, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर या पुनर्विकासाला स्थगिती दिली. आता ही स्थगिती उठविण्यात आली असून टाऊनशिपच्या माध्यमातून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

छायाचित्र: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

सध्याच्या प्रस्तावित योजनांना ‘स्पेशल टाऊनशिप प्रोजेक्ट’ अंतर्गत आणण्याबद्दलही ते बोलत होते.   “सध्या सुरु असलेल्या योजनांची सद्यस्थिती, त्यांतील अडचणींबाबत विकासकांशी चर्चा करुन सध्याची सुरु असलेली व प्रस्तावित योजना टाऊनशिप ‘स्पेशल प्रोजेक्ट’ म्हणून करण्यासंबंधीची माहिती अहवालात नमूद करावी. तसेच आर्थिकदृष्ट्या शासनाची गुंतवणूक करुन योजना पुढे कशी नेता येईल, यासंबंधी एका महिन्याच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने शासनास अहवाल सादर करावा”, असे निर्देश यावेळी श्री. महेता यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आणखी 25 हजार घरांची योजना – मुख्यमंत्री

हा अहवाल गृहनिर्माण विभागाकडे अभिप्रायासाठी जाईल. नंतर विभागाच्या अभिप्रायासह अहवाल सादर झाल्यावर मुख्यमंत्र्यांना ते सादर केले जाईल. त्यांच्या स्वीकृतीनंतर रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर यांच्या एकत्रित विकासाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही महेता यांनी सांगितले.

अनधिकृतच…!

या बैठकीत गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीवकुमार, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे श्री. मिटकर व महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here