शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!

नाशिक- आज समाजात विविध यशोशिखरं गाठणार्‍या प्रत्येक व्यक्तीमागे परिश्रम आणि संघर्षाची जोड असते. त्याशिवाय यशप्राप्ती कठिण आहे. यशाची शिखरे गाठण्यापूर्वी प्रचंड असे परिश्रमातून जावे लागते. परंतु यात सातत्य ठेवणे खुप महत्वाचे आहे. आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने गौरविण्यात आलेल्या पुरस्कारार्थींचे जीवनही अशाच संघर्षमय वाटचालीतून गेले आहे त्यांच्या कतृत्वाला सलाम करत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुरस्कारार्थींचा सन्मान केला.समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणार्‍या मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गंगापूरारोड वरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजीत या सन्मान सोहळयाप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री विनायकदादा पाटील सुविचार मंचचे अॅड.रविंद्र
पगार, अॅड. अशोक खुटाडे, आकाश पगार  उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात कला क्षेत्रात अभिनेते स्वप्नील जोशी व अभिजित खांडकेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन आकाश पगार यांनी केले.यावेळी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करतांना आ.चव्हाण म्हणाले,  यश मिळवणे तितकसं सोप नाही. आज जरी यशस्वी मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सत्कार करण्यात आला असला तरी हे यश गाठण्यासाठी त्यांना मोठया संघर्षातून जावे लागले आहे. मी देखील आयुष्यात संघर्ष केला आहे. त्यामूळे संघर्षाच्या काळात व्यक्तीने चिकाटी ठेवणेही तितकेच महत्वाचे असते. नाशिकही साहीत्य नगरी असून गोदातीरावर आज या नवरत्नांचा सत्कार करून विशेष
आनंद झाल्याचे ते म्हणाले. सुविचार मंचने कतृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याला झळाळी तर दिलीच शिवाय समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.यावेळी बोलतांना माजी मंत्री विनायकदादा पाटील म्हणाले, असे म्हणतात माणसे हेरावित आणि माणसे पेरावित. हेरल्याशिवाय पेरता येत नाही परंतु हेरण्याचे काम अवघड असते. हे हिरे हेरण्याचे काम करणार्‍या सुविचार गौरव पुरस्काराने केले आहे. या कार्यात सातत्य ठेवा, सातत्यातून या कार्याला निश्‍चितपणे वैभव प्राप्त होईल असे सांगत त्यांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात फॅशन शो, नृत्य, गाणे सादर करण्यात आली.  यावेळी डॉ.रविंद्र सपकाळ (शैक्षणिक), दिपक बागड (उद्योग), हृदयरोग तज्ञ डॉ. आशुतोष साहु  (वैद्यकीय), विश्वास ठाकूर (सामाजिक), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडु माया सोनवणे (क्रीडा), जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर (साहित्य) तर स्वप्निल जोशी (कला) आणि माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेते
अभिजीत खांडकेकर यांचा विशेष सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीवर प्रेम करा –   चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी

आम्ही कलाकार नावारूपाला आलो ते आपल्या म्हणजेच रसिक प्रेक्षकांच्या
बळावर तुमचे प्रेम असेच मिळत राहो आणि मराठी चित्रपटसृष्टी अशीच मोठी होत
राहील अशी अपेक्षा चित्रपट अभिनेते स्वप्निल जोशी यांनी सत्काराला उत्तर
देतांना व्यक्त केली.  अभिनेता हा आपल्या अभिनयातून समाजाला प्रेरणा
देण्याचे काम करतो परंतु सुविचार गौरव पुरस्काराने मला अधिक चांगले काम
करण्याची प्रेरणा दिली असून या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली
असल्याची जाणीव मला आहे असे प्रतिपादन देखील  चित्रपट अभिनेते स्वप्निल
जोशी यांनी केले.

राधिकाला त्रास देत राहणार- अभिजित खांडकेकर

मी मुळचा नाशिकचा असल्याने सुविचार गौरव पुरस्कार म्हणजे माझ्या लोकांनी
दिलेली ही शाबासकिची थाप आहे. खरं म्हणजे पुरस्कार हा चांगली कामगिरी
करणार्‍यांना दिला जातो मात्र मी सिरीअलमध्ये व्याभिचार करूनही मला
सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले हे माझ्यासाठी
अभिमानास्पद आहे. हिरे चमकत असतात परंतु त्यांची ओळख जवाहीराकडूनच होउ
शकते आज हे काम सुविचार मंचने केले त्याबददल त्यांचे आभार व्यक्त करतो
असे प्रतिपादन माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी
यावेळी सत्काराला उत्तर देतांना केले.
माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी यावेळी
बोलतांना सांगितले की, माझ्या नवऱ्याची बायको मध्ये राधिकाला सातत्याने
आपण त्रास देत आपल्या भूमिकेला न्याय देणार असल्याचे सांगताच सभागृहात
टाळ्यांचा कडकडाट झाला.

मुलींना प्रोत्साहन द्या- महिला क्रिकेटपटू माया सोनवणे

माया सोनवणे या महिला क्रिकेटपटूचा यावेळी सुविचार गौरव पुरस्काराने
सन्मान करण्यात आला. संगमनेर तालुक्यातून महीलांच्या राज्य क्रिकेट संघात
झेप घेणार्‍या माया जाधव हि मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी राहीली असता
टाळयांचा कडकडाट झाला यावेळी आपला संघर्षमय प्रवास कथन करतांना पालकांनी
मुलींनाही तितकंच प्रोत्साहन दिल्यास निश्‍चितपणे मुलीही विविध क्षेत्रात
मुलांपेक्षाही पुढे जातील असे सांगत मुलींना मुलांपेक्षा कमी न लेखता
त्यांना समाजाने प्रोत्साहन देण्याचे आवाहन महिला क्रिकेटपटू माया सोनवणे
यांनी यावेळी केले.

चौकट – करत राहू दुनियादारी ….
अभिनेते स्वप्निल जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांची एक झलक पाहण्यासाठी
सभागृहात तरूण तरूणींची मोठी गर्दी जमली होती. यावेळी अभिनेते स्वप्निल
जोशी मनोगत व्यक्त करायला उभे राहील्यानंतर चित्रपटाचा डायलॉग ऐकविण्याची
इच्छा युवकांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी तेरी मेरी यारी…. करत राहू
दुनियादारी हा डायलॉग ऐकवताच तरूणांनी टाळयांचा व शिट्ट्यांचा कडकडाट
केला.

तरुणाईची सेल्फीसाठी झुबंड
अभिनेते स्वप्निल जोशी आणि अभिजीत खांडकेकर यांची झलक पाहण्यासाठी आतुर
झालेल्या तरुणाईची कार्यक्रम संपल्यावर या दोघांसमवेत सेल्फी काढण्यासाठी
अक्षरक्ष: झुबंड उडाली होती. यात युवती आघाडीवर दिसत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here