नोकरी देण्यासाठी देशातील मोठ्या कंपन्यांच गावापर्यंत पोहोचणार

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली

टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम ही एक नवीन पद्धत आहे, जी यापुढेही कामाला येईल. आता गावांमध्येही ब्रॉडबँडची सेवा पोहोचली असल्याने भविष्यातही वर्क फ्रॉम होम करण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे शहरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी नागरिकांना शहरात येण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती भारतीय औद्योगिक संघाचे (CII : Confederation of Indian Industries) नवे अध्यक्ष उदय कोटक यांनी दिली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

यावेळी बोलताना कोटक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशभरातील लाखो कुशल कर्मचारी, मजूर, कामगार आपापल्या गावी स्थलांतरित झाले आहेत. लॉकडाऊनच्या पूर्वी ग्रामीण ते शहर असे स्थलांतर होत होते. आता शहर ते ग्रामीण असे उलट स्थलांतर होत आहे. एक प्रकारे हे ग्रामीण-शहरी संतुलन ठरणार असेल. त्यामुळे गावांजवळ कारखाने उभरणाऱ्यांना कुशल कामगारांची कमतरता भासणार नाही. गरज भासल्यास त्यांना पुन्हा पुर्नकौशल्यित (Re-skill) करू शकतो. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक कार्यक्षम करता येऊ शकते, असेही उदय कोटक यांनी सांगितले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

आतापर्यंत मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची असल्यास लोकांना महानगरांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, आता नोकरी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्याची गरज भासणार नाही. कारण देशातील मोठ्या कंपन्यांच त्यांच्या गावापर्यंत पोहोचणार आहेत. दुसरीकडे, सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन विविध पावले उचलत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत, की तेथेही कामगारांना काम करण्यात अडचण येणार नाही. उद्योग संघटना म्हणून सीआयआय या नव्या संकल्पनेला प्रोत्साहन देईल. त्यामुळे, देशातील टाळेबंदी उघडल्यानंतर कर्मचारी, मजुरांना शहरांमध्ये धक्के खावे लागणार नाही की झोपडपट्ट्यांमध्ये राहावे लागणार नाही, असेही कोटक यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here