विदर्भातील रब्बीच्या धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ !

छायाचित्र : marathibrain.com

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

 

ब्रेनवृत्त | नागपूर

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केंद्राकडे मागणी केलेली होती. त्यामुळे केंद्र शासनाने रबी हंगामातील धान खरेदीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

छायाचित्र : marathibrain.com

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली इ. जिल्ह्यांत रबी हंगामाचे उन्हाळी धान खरेदी करण्याकरिता शासनाकडून ‘शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र’ सुरु करण्यात आले आहेत. या शासकीय धान खरेदी केंद्रावर प्रशासनाकडून 30 जूनपर्यंत धानाची खरेदी केली जाणार होती, मात्र यावेळी उन्हाळी धान पिकांचे विदर्भात उशिरा व मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान अजून त्यांच्याकडे पडून आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडून त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यामुळे धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी केली जात होती.

धान खरेदीला मुदतवाढ देण्यासाठी छगन भुजबळ यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. राज्याच्या मागणीला उत्तर देत केंद्र शासनाने धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ दिल्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, केंद्र शासनाच्या ‘विकेंद्रित खरेदी योजने’अंतर्गत राज्यातील रबी हंगामातील गव्हाची खरेदी केली जात आहे. सदर खरेदीला एक महिना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केलेली मागणी केंद्राकडून मंजूर करण्यात आलेली आहे. राज्यात पहिल्यांदाच केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत गव्हाची खरेदी केली जात आहे.

राज्यात प्रथमच शासकीय सेंद्रिय धान्य खरेदी-विक्री केंद्र

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांची पाहणी केली व उपाययोजनांच आढावा घेतला होता.

● पूर्व विदर्भात रब्बीच्या भात पिकाचे नुकसान

दरम्यान, यंदा पूर्व विदर्भातील रब्बीच्या धानपिकाची कापणी आणि मळणी लांबणीवर गेली आणि मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश भागात रब्बी हंगामातील भात शेती उपसा सिंचन प्रकल्पांवर आधारित असते. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या परिसरातील व इतर ठिकाणी भाताचे पीक काढायला उशीर झाला आणि मान्सूनच्या लवकर आगमनाने शेतकऱ्यांचे पीक शेतातच अडकून बरेच नुकसान झाले. पाटबंधारे विभागाचे यंदा रब्बीसाठी पाणी उशिरा सोडल्याला त्याचा परिणाम पूर्ण शेतीवर झाला व धानाचे पीक काढायला उशीर झाला, असेही अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, अनेक धान्य खरेदी केंद्रांवर शासनाच्या निर्देशांना डावलले जात असून, मुदतसंपण्याआधीच शेतकऱ्यांना धान पीक विक्री करण्याची मुदत संपली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, काहीही कारणे सांगून दरामध्येही कपात केली जात आहे. आता धान खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here