सत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

सत्तेच्या नादात राज्यातील अवकाळी पावसामुळे ओल्या दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र जगण्याच्या पेचात पाडू नका, अशी टीका शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

 

मुंबई, ४ नोव्हेंबर

“मुख्यमंत्री पदाच्या वादात राज्यातील शेतकरी मात्र पेचात पडू नये”, असे म्हणत शिवसेनेने परत एकदा ‘सामना’तून भाजपवर खोचक टीका केली आहे. ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, शासनाने याकडे लक्ष द्यावे. नाहीतर मुख्यमंत्रीपदाच्या पेचात शेतकऱ्यांनाच जगण्याचा पेच पडेल, असा घणाघात शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून भाजपवर केला आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस झालेत, मात्र अजूनही राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही. विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे, तर भाजपला हे सत्तावाटप मान्य नाही. राज्य पातळीवर हा तिढा काही मिटणार नाही, असे काहीसे सध्याचे चित्र आहे. पण यामुळे राज्यातील शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष भाजपला लक्ष केले आहे. आजच्या सामानाच्या अग्रलेखातून ‘सरकार बनवण्याच्या पेचात शेतकरी मात्र पेचात पडू नये’, अशी खोचक टीका भाजपवर करण्यात आली आहे.

हेही वाचा : महायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ‘सामाजिक परिवर्तन’ : रामदास आठवले

राज्यशासनाची ‘शेतकरी अपघात विमा योजना

सामानाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, या वर्षी पाऊस बरा झाल्यामुळे भातशेती जोमात आली. शेतकरी आनंदी होता. दोन दिवस कोरडे वातावरण असल्याने अनेकांनी आपली पिके कापून खळ्यावर टाकली होती, पण अवकाळी पावसाने खाण्याइतके लावलेले पीकही उद्ध्वस्त झाले. अवकाळी पावसाने उध्वस्त केलेल्या शेतकऱ्यांना पडेल ती किंमत मोजून जगवायला हवे. ओल्या दुष्काळावर मात व्हावी . शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी थांबावे यासाठी आम्ही जे जे शक्य आहे ते सर्व करीत आहोत. सरकारने अवकाळी ओल्या दुष्काळाने केलेली शेतकऱ्यांची कोंडी आधी फोडावी. सरकार बनविण्याच्या पेचात शेतकऱ्यांना जगण्याचा ‘पेच’ पडू नये. असा घणाघात शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर केला आहे.

मराठवाड्यात ११ महिन्यांत ८५५ शेतकरी आत्महत्या !

राज्यातील पावसाळी स्थिती अजून ओसरलेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात सत्तेची कोंडी असली, तरी शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची कोंडी फुटणे आवश्यक आहे. जो बळीराजा राजकारण्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवतो, त्याचीच अवस्था लाचारासारखी होते. राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं, तर न्याय कुणाकडे मागायचा? अशी अवस्था राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात व कोकणात भातशेती, इतरत्र खरिपाची पिके, द्राक्ष, ऊस, कापूस, सोयाबीन, फळबागा असे हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने झोपवले आहे. मात्र, याकडे कोण लक्ष देणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, विधानसभा निवडणूक झाली व निकालही हाती आले, पण मुख्यमंत्री पदासाठी राजकीय पक्ष अजूनही ओढाताण करताहेत. मात्र राज्याचा मुख्यमंत्री काही केल्या ठरेना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here