अर्थसंकल्प २०२०-२१ : प्राप्तिकर दरांत मोठी कपात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत ‘अर्थसंकल्प २०२०-२१’ सादर केला असून, या अर्थसंकल्पातून प्राप्तिकराचे (आयकर) दर कमी करण्यात आले आहेत. 

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी नव्या कर रचनेची घोषणा केली आहे. नव्या रचनेनुसार करांचे दर कमी झाले असून, आता 5 ते 7.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्केच कर द्यावा लागणार आहे.

मोदी २.० कार्यकाळातील पहिला आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी दुसरा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करविषयी मोठा निर्णय घेण्यात आला असून, कररचनेत बदल करण्यात आले आहेत. नव्या कर दरांनुसार आता अडीच ते पाच लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर द्यावा लागेल. तर, अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तच ठेवण्यात आले आहे. तसेच, 5 ते 7.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आधी 50 हजार रुपये कर द्यावा लागत होता, मात्र आता त्यांना 25 हजार रुपये कर द्यावा लागेल.

दुसरीकडे, १५ लाखांच्या वर असलेल्या उत्पन्नावर आकारला कर ३० टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. तर, 12.5 ते 15 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना आता 25 टक्के दराने कर द्यावा लागेल. त्यामुळे या वर्गातील लोकांना/संस्थांना 2.5 लाख रुपयांऐवजी 1.75 लाख रुपये कर द्यावा लागणार आहे. तसेच, 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना नव्या कर रचनेनुसार 62 हजार 500 रुपये होईल.

एकंदरीत, 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना आजपर्यंत 1.75 लाख रुपये टॅक्स द्यावा लागत होता, त्यात घट होऊन 1 लाख 12 हजार 500 नव्या दरानुसार भरावे लागतील. तसेच, 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणारे जे करदाते 2.5 लाख रुपये कर भरत होते, त्यांना आता 1.75 लाख रुपये कर द्यावा लागणार आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here