गडमाता देवराईचे संवर्धन, मात्र बाजूची टेकडी वृक्षहीनच !

‘सेक्रेड ग्रोव्ह’ या संकल्पनेमुळे व लोकांच्या श्रद्धेमुळे गडमाता टेकडी ही हिरवळीने नटली आहे, मात्र बाजूची टेकडी ओसाड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या टेकडीवर अतिक्रमणाची परिस्थितीही निर्माण झाली असून, एकीकडे हिरवळ आणि दुसरीकडे ओसाड डोंगर अशी विसंगती निर्माण झाली आहे.

 

ब्रेनवृत्त | पर्यावरण 
प्रतिनिधी, सालेकसा

गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले गडमाता देवस्थानचे परिसर परत एकदा चर्चेचा विषय बनले आहे. एकीकडे गडमाता टेकडीवरील देवराई (सेक्रेड ग्रोव्ह) श्रद्धेच्या कारणास्तव हिरवळीने बहरून निघाली आहे, तर ह्याच देवराईच्या बाजूला असलेली दुसरी टेकडीवर मात्र एकही वृक्ष शिल्लक उरलेले नाही. ह्या परिस्थितीकडे वन प्रशासनानेचेही लक्ष नसल्याने ही विसंगती आता अजूनच गंभीर होत चालली आहे.

फोटो १ : गडमाता देवराई परिसर, सालेकसा

सालेकसा परिसरातील गडमाता टेकडीवरील हिरवळ आणि घनदाट व हिरव्यागार वृक्षांनी टेकडीला शोभिवंत रूप दिले आहे. इथे असणारे विविध प्राणी, पक्षी आणि झाडे यांची एक वेगळीच परिसंस्था तयार झाली असून हे सर्व गडमाता परिसरात स्वतंत्र जैवविविधता जपून आहेत. ही हिरवळ साध्य होण्याचे मोठे कारण म्हणजे गावातील नागरिकांची गडमाता टेकडीबद्दलची आपुलकी आणि देवराईविषयीची श्रद्धा. यामुळे या टेकडीकडे गावकऱ्यांचे नेहमी लक्ष असते, त्यामुळे आजही इथे वृक्ष टिकून आहेत. ही गडमाता टेकडी ‘देवराई’ (सेक्रेड ग्रोव्ह) म्हणून प्रसिद्ध असल्याने नागरिकांची विशेष श्रद्धा आहे.

हेही वाचा : ‘होय ! मी शेतकरी

सारं काही अबोलच !

देवाच्या नावाखाली अशा पद्धतीने निसर्गाचे संवर्धन करण्याला इंग्रजीत ‘सेक्रेड ग्रोव्ह’ असे संबोधले जाते. वड, पिंपळ, उंबर अशा वृक्षांना आधीच धार्मिक कार्यात महत्व प्राप्त आहे. त्यात सेक्रेड ग्रोव्ह किंवा देवराई संकल्पनेतून एक संपूर्ण क्षेत्र राखीव ठेवून त्यातील जैवविविधता आणि वनांचे संवर्धन केले जाते. यासाठी विशेष प्रयत्न घ्यावे लागत नाही, उलट लोकांच्या वनदेवतेवरील श्रद्धेमुळेच अनेक ठिकाणी जैवविविधता जपली जाते. भारतात अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्येत असे धार्मिक स्थळ आहेत ज्यामुळे वनांचे रक्षण झाले आहे.

फोटो २ आणि ३ : गडमाता देवराईच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील हिरवळ आणि झाडे नष्ट झाल्याने ओसाड माळरानसदृश्य स्थिती

 

याच ‘देवराई’ संकल्पनेचा फायदा गडमाता टेकडीला झाला आहे. यामुळे गडमाता परिसरातील जवळपास 10 हेक्टर वनसंरक्षण झाले आहे. मात्र, शोकांतिका अशी की बाजूची टेकडी, जी देवराई म्हणून प्रसिद्ध नाही, तीवर एकाही वृक्षाचा पत्ता नाही. ही टेकडी नागरिकांनी वृक्षतोड करत संपूर्णपणे ओसाड केली आहे. या टेकडीवर सध्याच्या परिस्थितीत एकही वृक्ष शिल्लक उरले नसून, फक्त काही झुडुपे तेवढी नजरेस पडतात.

ओझोनचा थर : पृथ्वीवरील जीवसृष्टीचा संरक्षक

एकीकडे देवाच्या नावाखाली वृक्षसंवर्धनाचे वृत्त जपणारे लोक दुसरीकडे मात्र, निसर्गाबद्दल गंभीर नाहीत. यामुळेच बाजूच्या टेकडीवरील वसुंधरेचे सौंदर्य पार लयाला गेले आहे. दरम्यान, ह्या टेकडीच्या संवर्धनाची जबाबदारी ज्या वनविभागाकडे देण्यात आली आहे, त्यांनीसुद्धा ह्या टेकडीवर पुरते दुर्लक्ष केले आहे. सालेकसा-नानव्हा रस्त्यावरील ह्या टेकडीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे याठिकाणी अतिक्रमणाचा प्रकोपही बघायला मिळत आहे. तरीही वन विभाग व संबंधित प्रशासनाने या दुरावस्थेकडे लक्ष देऊन टेकडीचे संवर्धन करण्यासाठी योग्य ते पर्याय योजावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here