गोवा विज्ञान केंद्राद्वारे ‘कोव्हिड-१९’ विरुद्ध विविध तंत्रज्ञान विकसित

ब्रेनवृत्त, पणजी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालायाचे गोवा विज्ञान केंद्र, कोरोना संबंधित काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी चेहऱ्यावर लावण्याचे संरक्षक आवरण तयार करत आहेत. याकरिता हे केंद्र आपल्या ‘इनोव्हेशन हब’ मधील ‘त्रिमितीय छपाई तंत्रज्ञाना‘चा (3D Printing Technology) वापर करीत असून, ही संरक्षक आवरणे गोवा सरकारच्या आरोग्य विभागाला पुरविली जात आहेत.

संरक्षक आवरणांच्या निर्मितीसाठी गोवा विज्ञान केंद्र वापरत असलेले त्रिमितीय छपाई यंत्र

याशिवाय, टाळेबंदी कालावधीत गोवा विज्ञान केंद्राने सार्वजनिक, तसेच केंद्र सदस्यांसाठी नियमित कार्यक्रम आयोजित केले आहेत. सोबतच, यासाठी ‘ऑनलाइन’ सुविधेचा वापर करण्यात येत आहे. गोवा विज्ञान केंद्र आणि ‘राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेत’र्फे माहितीचा प्रसार जाणून घेण्यासाठी विविध ‘ऑनलाईन’ माध्यमातून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. याव्यतिरिक्त घरातून करता येण्यासारखे उपक्रम, मेंदूला चालना देणारी कोडी अशाही गोष्टी घेण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्ताने वैज्ञानिक खेळणी तयार करण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती.

गोवा विज्ञान केंद्र, विज्ञान व तंत्रज्ञानातील शैक्षणिक-मनोरंजनाचे ठिकाण म्हणून विकसित केले जात आहे. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाबद्दलची गोडी व उत्साह निर्माण करणे, हा गोवा विज्ञान केंद्राचा उद्देश आहे.

गोवा विज्ञान केंद्राचे ‘त्रिमितीय छपाई यंत्र’ कसे काम करते हे पाहण्यासाठी www.sciencecentre.goa.gov.in या अधिकृृृत संकेतस्थळावर माहितीपर चित्रफीत उपलब्ध करण्यात आली आहे. खालील लिंकवरूनही आपल्याला ते बघता येईल. https://twitter.com/PIB_Panaji/status/1260117492632084481?s=19

(पीआयबी महाराष्ट्रच्या संदर्भांसह)

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here