लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ईस्टर्न आर्मीचे कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्याच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत, त्यानंतर उपप्रमुखपदाची जबाबदारी नरवणे यांच्याकडे येणार आहे.

मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यंचू भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नरवणे गेल्या 37 वर्षांपासून भारतीय सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी इन्फंट्री ब्रिगेडचेही नेतृत्त्व केले आहे. जम्मू-काश्मीरमधील घुसखोरांना यमसदनी पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

नरवणे यांच्या लष्कराचे उपप्रमुख झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर अनिल चौहान यांची लेफ्टनंट जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हवाई स्त्राईकच्या मोहिमेत चौहान यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

 

लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्याबद्दल

१. मनोज नरवणे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. एनडीएतील प्रशिक्षणानंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतले.

२. जून 1980 मध्ये ते शीख लाईट इन्फंट्रीमधून लष्करात दाखल झाले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

३. काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरुन कोलकातामधील पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नेमणून करण्यात आली.

४. यावर्षी मार्च महिन्यात लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर यावर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्त होणार आहे. त्यांच्यानंतर लष्करप्रमुख पदासाठी मनोज नरवणे व तसेच सैन्याचे उत्तरेतील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांचे नाव चर्चेत आहे. नरवणे यांची नियुक्ती झाल्यास त्यांच्या रुपाने मराठी व्यक्तीची लष्करप्रमुखपदी निवड होईल.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here