वीज कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगारवाढ !

ब्रेनवृत्त | मुंबई 

ऐन विधानसभा निवडणुकीच्या आणि दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य शासनाने वीज कर्मचाऱ्यांना यंदाच्या वेतनकरारात भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे ३३ टक्के आणि वेगवेगळ्या भत्त्यामध्ये १०० वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज कर्मचाऱ्यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वेतनकरारात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदाच्या वेतनात ३२.५ टक्के वेतनवाढ करण्याचे शासनाने ठरवले आहे. सोबतच, विविध प्रकारच्या भत्त्यांमध्ये १०० टक्के वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाचे तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.

सौभाग्य योजनेत मोठ्या राज्यांचा मंद वेग

गुरूवारी तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत आणि विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीमध्ये बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली. या निर्णयानुसार १२५ टक्के महागाई भत्ता मूळवेतनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक सहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून, आता पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार व तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाशिवाय २० टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. वर्ग ४ च्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here