“५ वर्षांत १ कोटी रोजगार देणार” : भाजपचा जाहीरनामा

ब्रेनवृत्त | मुंबई 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज संकल्पपत्र जाहीर केेले. गेल्या पाच वर्षांत जे काम झाले आहे, त्या अनुभवावरून पक्षाचे संकल्पपत्र तयार करण्यात आले आहे आणि येत्या पाच वर्षांत १ कोटी जनतेला रोजगार देणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत या ‘संकल्प पत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे.

एकीकडे राज्य आणि केंद्र सरकारवर बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवरून टिकांचा वर्षाव होत असताना, भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यातून महाराष्ट्रात पुढील ५ वर्षांत १ कोटी लोकांना रोजगार देणार असल्याचे म्हटले आहे. सोबतच, १ कोटी महिलांना स्वयंसहायता गटांशी जोडण्याचे व मूलभूत सुविधांसाठी केंद्र शासनाशी गुंतवणूक करून ५ लाख कोटी रुपये उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या १० पैकी ६ राज्यांत भाजपची सत्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या जाहिरनाम्यात दुष्काळ, पाणी आणि रोजगार या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला असल्याचे म्हटले आहे. संकल्पपत्रात नदीजोड प्रकल्प मार्गी लावणार असल्याच्या उल्लेखही आला आहे, तसेच मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे जाहिरनाम्यातून सांगण्यात आले आहे.

महाआघाडीच्या प्रचारासाठी खा. पटेल आज तिरोडा मतदारसंघात

सोबतच, विविध प्रकल्पांचा उल्लेख करत आगामी निवडणूक गाजवण्याची तयारी भाजपने त्यांच्या जाहिरनाम्यातून केलेली दिसते. यावेळी विविध योजनांचा उल्लेख करायलाही भाजप विसरलेले नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला वाढीव निधी उपलब्ध करून देणे, गावांना इंटरनेटशी जोडणे, कामगारांना संरक्षण देणे, शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटीबीयांना संरक्षण देणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व पुनर्विकास करणे, इत्यादी इत्यादी आश्वासनांचा उल्लेख भाजपच्या जाहीरनाम्यात आला आहे.

जाहिराती बघून साबण-तेल निवडा, नेता नको : खासदार अमोल कोल्हे

तसेच, राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले असून, यामुळे शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील रोजगारांत वाढ होईल, असा दावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here