खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’ संस्था

ब्रेनवृत्त | मुंबई 

राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र ‘अमृत’ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात येणार आहे. काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संबंधित प्रवर्गातील तरुणांच्या आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी या संस्थेद्वारे विशेष कार्य केले जाणार आहे.

राज्यातील विविध घटकांच्या विकासासाठी राज्यशानाने यापूर्वी सारथी आणि महाज्योती या संस्था स्थापना केल्या आहेत. केंद्र शासनाने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बळ घटकांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आर्थिक दुर्बळ घटकांच्या कल्याणासाठी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक होते. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांच्या धर्तीवर आता ‘अमृत’ संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर; ‘एसईबीसी’ला १६% आरक्षण

 

● राज्यातील विविध सामाजिक संस्था

राज्यातील अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी, तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने ‘सारथी’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)’ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. आता लवकरच अमृत संस्थेची स्थापना करण्यात येणार असून, या संस्थेची स्थापना व कार्यान्वयनासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

फेब्रुवारीपासून लागू होणार १०% आरक्षण

‘अमृत’च्या माध्यमातून आर्थिक दुर्बळ घटकांतील तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार, उच्चशिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्‍तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्यात येणार आहे. तसेच कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफिल-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोबतच, महिलांचे सक्षमीकरण, समुपदेशन व मार्गदर्शन या बाबींवरही लक्ष देण्यात येणार आहे.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here