राज्याच्या ‘व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा’चे ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ असे पुनर्नामकरण

राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा’चे ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ असे नामकरण करण्यात आले आहे. 

 

ब्रेनवृत्त | मुंबई

राज्याच्या ‘महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळा’चे पुनर्नामकरणाचा शासनाने निर्णय घेतला असून, मंडळाचे नवे ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने हे नामकरण करण्यात आले आहे. राज्याच्या कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल म्हटले.

● व्यवसाय शिक्षण मंडळांतर्गत एकूण २९२ अभ्यासक्रम

राज्याच्या व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळांतर्गत विविध गटांतील शैक्षणिक अर्हतेनुसार एकूण २९२ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. यांमध्ये ६ महिने कालावधीचे १५२ अभ्यासक्रम, १ वर्ष कालावधीचे ९६ आणि २ वर्ष कालावधीचे ४४ अर्धवेळ व पूर्णवेळ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार ०८४ संस्थांमध्ये राबविण्यात येतात. या अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सुमारे ५० ते ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेत असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या मंडळामार्फत घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्या वतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते. राज्यातील विविध भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यासाठी वरदान ठरतात.

राज्यामध्ये या परीक्षा मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना +२ स्तराची समकक्षता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच, मंडळाचे १ वर्ष व २ वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे मंडळाच्या काही अभ्यासक्रमांना भारत सरकारतर्फे शिकाऊ उमेदवारी देखील प्रदान करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी इयत्ता दहावी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना ‘पदविका अभ्यासक्रम’ (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच मंडळाचे संगणक गटातील अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येतात. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीसाठी त्याचा लाभ होतो. मंडळाचे वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व कनस्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रम सार्वजनिक बांधकाम विभागातील “स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक” या पाठ्यक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येतात. तसेच जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष समजला जातो. अशाप्रकारे मंडळाच्या विविध अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध लाभ होतात, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

सन 1986 मध्ये राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे तंत्रशिक्षण संचालनालय आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय असे विभाजन करण्यात आले होते. औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (एंड-ऑन कोर्सेस) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ सुरु करण्यात आले. कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना मिळण्याच्या दृष्टीने या मंडळामार्फत व्यवसायभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी व वेगवान अंमलबजावणीसाठी या परीक्षा मंडळामार्फत कामकाज केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here