जेष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे निधन

चंद्रपूर, २४ सप्टेंबर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व चंद्रपूरचे लाडके माजी केंद्रीय अर्थराज्य मंत्री शांताराम राजेश्वर पोटदुखे यांचे काल दुपारी वाजता नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

 

८५ वर्षीय शांताराम पोटदुखे यांना सोमवारी हृदयविकाराचा त्रास झाल्याने, नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची वार्ता पोहचताच चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी सुधा, मुलगा भरत, मुलगी भारती चवरे व नातवंडे असा आप्त परिवार आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असले तरी मूलत: राजकारणात राहूनही कोणतीही संस्था, व्यक्ती आणि समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा याकडेपाहण्याचा दृष्टीकोन निरपेक्ष होता. शांताराम पोटदुखे यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याने शांत, संयमी आणि सुस्वभावी नेता गमावला आहे. आज शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणारा आहेत.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला होता. चौथ्यांदा ते खासदार झाले तेव्हा त्यांचा राजकारणातला दांडगा अनुभव बघून त्यांच्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ते. राजकारणात त्यांना कधीही विरोधकांवर आरोप करताना बघितले नाही. सुधीर मुनगंटीवार हे आमदार असताना एकाच मंचावर एकत्र आले असता त्यांनी मुनगंटीवार यांचे जाहीर कौतुक केल्याचेही सर्वश्रुत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते शिक्षण घेत असताना त्या काळात चंद्रपुरात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे नागपूरशिवाय पर्याय नव्हता. मात्र त्यांचे मित्र हुशार असतानाही गरिबीमुळे नागपूरला उच्च शिक्षणासाठी जाऊ शकले नाही. ही खंत त्यांच्या मनात कायमची घर करून होती. तेव्हापासूनच त्यांनी चंद्रपूरसह ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करण्याची खूणगाठ बांधली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आजघडीला सहा शाळा व पाच महाविद्यालये आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठ्या हुद्यावर पोहचली आहे. त्यांनी राजकारणात आणलेले समाजकारण आणि आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यात केलेली शैक्षणिक क्रांती कधीही विसरू न शकणारी आहे.

राजकारणात राहूनही साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जनतेतून निघून गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जेष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांच्याबद्दल : 

  • शांताराम पोटदुखे यांचा जन्म ३० जानेवारी १९३३ रोजी झाला.
  • राजकारणात प्रवेश करण्याआधी त्यांनी बी.ए. आणि बी.जे.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
  • विदर्भातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघटनांचे ते अध्यक्ष होते.
  • विदर्भ मराठी साहित्य संघाचे ते विश्वस्त होते.
  •  १९८० पासून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी सुरुवात केली.  सुरवातीच्या काळातच, म्हणजे सन १९८०-१९८४, १९८४-९८, १९८९-१९९१ व १९९१-१९९६ असे सलग चारवेळा ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून निवडून आले.
  • सर्वप्रथम नेहरू विद्यालय सुरू केले. यापाठोपाठ सर्वोदय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सरदार पटेल महाविद्यालय सुरू केले.
  • विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मॅनेजमेंट, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची सोय चंद्रपुरात उपलब्ध करून दिली.
  • साहित्य क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यांनी २०१२ मध्ये चंद्रपूर येथे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरविले होते.

 

♦♦♦

तुमचे लिखाण, अभिप्राय आणि सूचना आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here