काश्मीरला जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांना मायावतींनी खडसावले

जम्मू-काश्मीरमधील स्थिती अजून सुधारायची असताना, काल काश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी आधी विचार करायला पाहिजे होते, अशा शब्दांत मायावती यांनी म्हटले आहे.

 

ब्रेनवृत्त | लखनऊ

२६ ऑगस्ट 

जम्मू काश्मीरला काल भेट द्यायला निघालेले राहुल गांधी, तसेच काँग्रेस व विरोधी पक्षातील जेष्ठ नेत्यांचा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तेथील वातावरण अजून सुस्थितीत येण्यास वेळ आहे, आणि अशात काश्मीरला भेट द्यायला निघालेल्या नेत्यांनी आधी विचार करायला पाहिजे होता, असे मायावती यांनी ट्विटमधून म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती बघण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी व इतर विरोधी पक्षातील नेते काश्मीर दौऱ्यावर निघाले होते. मात्र, केंद्राने त्यांची परवानगी नाकारत, त्यांना परत दिल्लीला पाठवण्यात आले होते. या स्थितीला केंद्रस्थानी ठेवून बसपाच्या वरिष्ठ नेत्या मायावती यांनी थेट कॉंग्रेसवरच निशाणा साधला आहे. काश्मीरला जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी विचार करायला पाहिजे होते, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे. “देशाला राज्यघटना मिळाल्याच्या ६९ वर्षांनंतर अनुच्छेद ३७० कायमचे रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पूर्वस्थितीत यायला अजून वेळ लागणे अपेक्षित आहे. यामुळे अजून थोडी वाट बघण्यात अर्थ आहे, आणि हे सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे”, असे मायावतींनी म्हटले आहे.

हेही वाचा : काँग्रेस गर्विष्ठ पक्ष : मायावती

पुढे काँग्रेसवर उपरोधिक टीका करत त्या ट्विटतात, “अशा परिस्थितीत काँग्रेस नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केंद्र सरकार व स्थानिक राज्यपालांना राजकारण करण्यास संधी देणे नव्हे का? अशावेळी, जम्मू-काश्मीरला जाण्याआधी काँग्रेस व इतर पक्षांच्या नेत्यांनी एकदा विचार करायला हवा होता. तेच त्यांच्यासाठी योग्य होते.”

संबंधित मुद्यावर ट्विटताना मायावती यांनी सुरुवातीला त्यांनी अनुच्छेद ३७० काढून टाकण्याचा का समर्थन केले याचेही स्पष्टीकरण दिले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सदैव समानता, एकता आणि अखंडतेचे पक्षधर होते. ते जम्मू-काश्मीरला अनुच्छेद ३७० द्वारे विशेष दर्जा देण्याच्या पक्षात कधीही नव्हते. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाला बसपानेही दिला” असे त्यांनी ट्विटमधून आपले म्हणणे मांडले आहे.

‘लाचारीचा पाठ गीरवायला हवा!’

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० या महिन्याच्या सुरुवातीस कायमचे काढून टाकण्यात आले आहे. त्यांनंतर तेथील जनसंपर्क आणि संचारसेवा हळूहळू पूर्वस्थितीत येत आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू झाली असली, तरी अजून काही ठिकाणी पूर्वस्थितीत परत येण्यास वेळ आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये इतर पक्षीय नेत्यांना जाण्यास बंदी आहे. काल राहुल गांधी आणि इतर विपक्षात असलेले नेते जम्मू-काश्मीर भेटीवर जात असताना, त्यांना परत दिल्लीला पाठवण्यात आले होते.

 

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here