एनआयटीमध्ये प्रवेशासाठी १२वीत ७५% गुणांची गरज नाही !

पीटीआय | नवी दिल्ली

‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था (NITs) आणि केंद्रशासनाद्वारे अनुदानित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांमध्ये २०२०-२१ या सत्रासाठी प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पात्रता निकषांमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यासाठी लागणारी बारावीमध्ये किमान ७५% गुणांची पात्रता मंत्रालयाने काढून टाकली आहे. यानुसार, संयुक्त प्रवेश परिक्षा मुख्य (जेईई मेन) उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे फक्त बारावी उत्तीर्ण झाल्याचा दाखल असणे आवश्यक आहे.

“सद्या सर्वत्र उद्भवलेल्या परिस्थितीस बघता केंद्रीय जागा वाटप मंडळाने (Central Seat Allocation Board) एनआयटी आणि इतर केंद्रशासन अनुदानित संस्थांमध्ये प्रवेशासाठीची पात्रता शिथिल करण्याचे ठरवले आहे”, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी ट्विट करत म्हटले आहे. “जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता फक्त बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करावा लागेल”, असेही पोखरियाल म्हणाले.

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (National Institute of Technology) आणि इतर शासकीय अनुदानित तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासोबतच इयत्ता १२वी मध्ये विद्यार्थ्यांना किमान ७५% गुण असणे आवश्यक असते किंवा प्रवेश परीक्षेत पहिल्या २० टक्केवारीत (Percentile) नाव असणे गरजेचे असते.

‘कोव्हिड-१९’च्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या सत्रासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा- मुख्य (जेईई मेन) दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here