‘बुलबुल’ होतंय अधिक तीव्र !

ब्रेनवृत्त, कोलकाता

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले ‘बुलबुल’ चक्रीवादळ दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसत आहे. ताशी 110 ते 120 किलोमीटर या वेगाने  बुलबुल ओडिशा, पश्चिम बंगालहून बांगलादेशाकडे सरकत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. या चक्रीवादळाने पश्चिम बंगालची सीमा ओलांडून आता ते बांग्लादेशच्या जवळ पोहोचले आहे.

बुलबुल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या काही किनारी भागांत मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यात उत्तर आणि दक्षिण भागातील 24 प्रातांचा समावेश आहे. पुढील 12 तासांमध्ये पूर्ण मदिनापूर आणि पश्चिम मदिनापूर, हावरा, नदिया, हुगळी भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वण्यात आली आहे. तसेच, पुढील 36 तासांमध्ये दक्षिण आसामसह मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : नैसर्गिक आपत्तींमुळे भारताचे ५.८ लाख कोटींचे नुकसान

ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्याला बुलबुलचा पहिला तडाखा बसला. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे या भागात प्रचंड नुकसान असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. ओडिशातील केंद्रपाडा, पुरी, बलासोर, कटक, मयूरभंज आदी ठिकाणच्या शाळांना कालपासून दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बुलबुल चक्रीवादळाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच, किनारपट्टी भागातील 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. काल या चक्रीवादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर होता. तो आज ताशी 135 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: