भारतात समूह संसर्ग झालेला नाही  : आयसीएमआर 

“भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग झालेला नाही”, अशी माहिती आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

“भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात कोरोना विषाणूचा समूह संसर्ग झालेला नाही”, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी दिली आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः मुंबई आणि दिल्लीत ‘कोव्हिड-१९‘ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात समूह संसर्गाला  सुरुवात झाली असल्याची भीती काहींनी व्यक्त केली.

केंद्र शासनाने देशात कोरोना विषाणूच्या समूह  संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचे सांगितले आहे. देशात वेळीच टाळेबंदी लागू केल्याने होणारा फैलाव रोखण्यात यश मिळाल्याचेही बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शहरी भागात कोरोनाचा फैलाव थोडा जास्त झाला आहे. पण संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी आणि त्यानंतर जे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणारा फैलाव थांबवण्यात यश मिळाले.”

मात्र, तरीही राज्यांनी सुरक्षेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता मिळाली असली, तरी काळजी घेण्यात शिथीलता आणू नये. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यांनी पाळत ठेवण्यासोबतच नव्या योजना आखण्याची गरज असल्याचेदेखील यावेळी बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले.

आयसीएमआर सर्वेक्षण : ‘कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !

सोबतच, आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल म्हणाले, “आज देशात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर (रिकव्हरी रेट) ४९.२१ टक्क्यांवर आला आहे. उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे आणि  ही दिलासादायक बाबा आहे.”

दुसरीकडे, देशातील नागरिक अद्यापही लॉकडाऊनबद्दल गंभीर नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत  ३५७ कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला आहे. एका दिवसात इतक्या जणांच्या मृत्यूची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर एकाच दिवसात सर्वाधिक ९९९६ रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान, जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेने भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचे म्हटले आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असे नोमुरामे म्हटले आहे. त्यामुळे भारतात टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता नोमुराने वर्तवली आहे. त्यामुळे नोमुराच्या या अभ्यासातून भारताची काळजी अधिकच वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here