कल्याण पूर्व येथे ‘प्रेमाचा फटका, कॉमेडीचा झटका’ कार्यक्रमाचे आयोजन

ब्रेनवृत्त | प्रतिनिधी
कल्याण, २२ डिसेंबर
कल्याण पूर्व येथील श्री. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानपीठ सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि संस्कृती कल्याण युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रेमाचा फटका, कॉमेडीचा झटका’ या कविता व सुखात्मिकांच्या (स्टँडअप कॉमेड) कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कविता व सुखात्मिका सादर केल्या. यावेळी जवळपास ३५ तरुण आणि तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, सहभागी कलाकारांपैकी बहुतांश कलाकार हे अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य क्षेत्रातील होते. इयत्ता दहावीनंतर मराठी भाषेशी हवा तितका थेट संबंध नसतानाही निव्वळ मातृभाषेच्या प्रेमाखातर हे विद्यार्थी कविता व सुखात्मिका यांच्या सादरीकरणाद्वारे आपल्या मायबोलीची नकळतपणे फार मोठी सेवा करीत आहेत.
आजच्या पालकांच्या इंग्रजी माध्यमाच्या वेडापायी येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने अशा भाषाप्रेमी युवकांचे कार्य फारच मोलाचे ठरते, असा संदेश या कार्यक्रमातून प्रसारित झाला. यावेळी संस्कृती युवा संस्थेचे राहुल राणे, वैभव कर्डक व नालंदा सामाजिक संस्थेचे प्रविण नागवंशी यांनी विशेष सहकार्य केले.
◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here