अंतर्गत मूल्यांकन म्हणजे काय?www.marathihelp.com

वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन होय. 

अध्यापनाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यांनुसार विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव योजनाबद्ध रीतीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक ते परिवर्तन घडून आले की नाही, म्हणजे विद्यार्थ्यांचा पूर्वीपेक्षा विकास झाला अथवा नाही, हे तपासणे; विकास जर झाला असेल, तर तो कितपत झाला आहे, हे पडताळून पाहणे म्हणजे मूल्यमापन होय. यासाठी विविध मूल्यमापनसाधनांची आवश्यकता असते. शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या सर्वांगीण विकासाची पडताळणी करण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन उपयोगी ठरते. सर्वांगीण विकासाच्या मूल्यमापनालाच सर्वंकष मूल्यमापन म्हणतात. अशा प्रकारचे मूल्यमापन करताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी होणार नाही. त्यासाठी निरीक्षण, आत्मनिरीक्षण, आविष्कार, नामनिर्देशन इत्यादी तंत्रांचा वापर करावा लागेल. जे मूल्यमापन सतत चालते, ते सातत्यपूर्ण मूल्यमापन होय.


अंतर्गत मूल्यमापनातून विद्यार्थ्यांचे अध्ययन किती झाले, ते अभ्यासात कोणत्या पातळीपर्यंत आहे, विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे कोणते, त्यांवर कोणते उपाय करायला पाहिजेत इत्यादी बाबी शिक्षकांस सहज समजून येतात. हे मूल्यमापन लहानलहान चाचण्यांद्वारे होत असल्यामुळे घटकांची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली, ते शोधणे सोपे जाते. वर्तनबदलाची तपासणीही मूल्यमापनाद्वारे होत असते. त्यामुळे दैनंदिन अध्यापनासाठीही त्याचा उपयोग होतो. अध्ययन-अध्यापनप्रक्रियेत सुधारणा करता येते. विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिविकास तपासण्यासाठी घटकचाचण्या, प्रात्यक्षिके यांचा विचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे व्यक्तिविकास पाहण्याकरिता अवलोकनात्मक तंत्रांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगांनी मूल्यमापन होऊ शकते. म्हणूनच अध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वागणुकीची नोंद ठेवून घटकचाचण्याच्या माध्यमातून त्याच्या उद्दिष्टात्मक प्रगतीचा आढावा घेऊन त्याद्वारे मूल्यमापन करणे यास अंतर्गत मूल्यमापन असे म्हणतात.

अंतर्गत मूल्यमापनाच्या पायऱ्या :

स्वाध्यायाचे अवलोकन : दैनिक अध्ययनाचा अभ्यास व विद्यार्थ्यांच्या स्वाध्यायाचे अवलोकन करून त्यांच्या प्रगतीची नोंद घ्यावी.
सतत मूल्यमापन : गुणात्मक व संख्यात्मक मूल्यमापननोंदी अध्यापक व मुख्याध्यापक यांच्या अभिप्रायांसह संकलित नोंदवहीत (Cumulative Record Card) करतात. अशा प्रकारे सतत वर्षभर विकासाचे मूल्यमापन करणे सोयीचे ठरते.
उद्दिष्टांची पूर्ती : घटकचाचण्या घटकाच्या अध्यापनानंतर घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती व उद्दिष्टे कितपत साध्य झाली, याचा आढावा घेतला जातो. यावरून अंतर्गत मूल्यमापनाच्या नोंदी घेतात.
अवलोकनात्मक तंत्रांचा वापर : पदनिश्चयन श्रेणी, पडताळासूची, प्रासंगिक नोंदी इत्यादी अवलोकनात्मक तंत्रांचा वापर करून त्यातून कौशल्य, अभिरुची, वृत्ती अशा विकासात्मक बाबी विचारात घेऊन अंतर्गत मूल्यमापन करण्यात येते.

अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे :

अंतर्गत मूल्यमापन केल्याने विद्यार्थ्याची केवळ पाठांतर करून पास होण्याची सवय कमी होऊन संबंधित पाठातील ज्ञान तो आत्मसात करीत असतो.
अध्यापन-अध्ययनप्रक्रियेत सुधारणा करता येते.
अध्यापकांना विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निदान करणे सुलभ जाते.
वर्तनबदलाची तपासणी या मूल्यमापनाद्वारे होत असते.
विद्यार्थ्यांना परीक्षेची वाटणारी भीती कमी होते.

अंतर्गत मूल्यमापन करताना घ्यावयाची दक्षता : मूल्यमापनात व्यक्तिनिष्ठतेचा दोष टाळण्यासाठी पुढील दक्षता घ्यावी :

प्रगती चांगली नसताना विद्यार्थ्यांना चांगले शेरे देणे, चांगले गुणदान करणे टाळावे.
व्यक्तिनिष्ठता कमी करण्यासाठी एकापेक्षा अधिक अध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापन करावे.
अवलोकननोंदी सविस्तर घ्याव्यात.
विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणदोषांची स्पष्ट कल्पना द्यावी. त्यामुळे त्यांत सुधारणा व प्रगती करण्यासाठी वाव मिळण्यास मदत होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 5694 +22