अंदाजपत्रकाचे किती प्रकार असतात?www.marathihelp.com

अंदाजपत्रक हे दोन भागात असते याला आपण अंदाजपत्रकाची रचना असे म्हणू शकतो. अंदाज पत्रक मांडताना दोन भागात विभागले जाते.

१) महसुली अंदाजपत्रक
२)भांडवली अंदाजपत्रक

१) महासुली अंदाजपत्रक -

या महसुली अंदाजपत्रकात सरकारच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्पष्टीकरण असते. महसुली अंदाजपत्रकाची पुन्हा दोन भागात विभागणी होते. ही विभागणी आर्थिक स्पष्टता यावी यासाठी असते.

अ )महसुली प्राप्ती
महसुली प्राप्ती म्हणजे सरकारचे उत्पन्न. सरकारच्या उत्पन्नाचे दोन स्त्रोत आहे त्यातला पहिला स्रोत अर्थातच कर उत्पन्नाचा (Tax) आहे आणि दुसरा करेतर उत्पन्नाचा (Non Tax). सरकारला कर आणि इतर शुल्कांपासून जो महसूल मिळवतो त्याला कर महसूल म्हणतात. करा पासून मिळणारे उत्पन्न हा सरकारचा महत्त्वाचा स्रोत आहे. करा व्यतिरिक्त इतर विविध स्रोतांपासून सरकारला जे इतर उत्पन्न मिळते त्याला करेतर उत्पन्न म्हणतात. कर उत्पन्नात उत्पन्न कर, वैयक्तिक प्राप्तिकर, संपत्ती कर इत्यादी कर येतात. करेतर उत्पन्नात गुंतवणुकीवरील व्याज, शुल्क, परवाना शुल्क, देणगी, अनुदाने, दंडात्मक उत्पन्न इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

ब ) महसुली खर्च
महसुली खर्च महसुली खर्च हा विकास आणि विकासतर खर्चात विभागला जातो विकास खर्च सामाजिक सेवा, सर्वसामान्य सेवा, दिलेले अनुदान इत्यादी खर्चाचा समावेश यात असतो तर विकासेतर खर्चात व्याज, व्यवस्थापन सेवा, हिशोब तपासणी, संरक्षण, चलन छपाई इ. खर्चांचा यात समावेश असतो.

२) भांडवली अंदाजपत्रक -
आगामी वर्षात सरकार किती भांडवली उत्पन्न मिळवणार व भांडवली खर्च कसा करणार याचे स्पष्टीकरण यात असते. भांडवली अंदाजपत्रकाची दोन भाग पडतात.

अ) भांडवली प्राप्ती
भांडवली प्राप्तीमध्यें नाणे बाजारातील कर्ज, देशांतर्गत इतर कर्ज, परकीय कर्ज, अल्पबचत, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी इत्यादी स्वरूपातील उत्पन्नाचा समावेश होतो.

ब) भांडवली खर्च
भांडवली खर्च हा असा खर्च असतो त्यातून संपत्ती निर्माण होते किंवा सरकारचे दायित्व कमी होते. अशा खर्चाला भांडवली खर्च असे म्हणतात. भांडवली खर्च विकासात्मक स्वरूपाचा असतो. भांडवली प्राप्तीतून हा खर्च भागवला जातो. या खर्चात संरक्षण, कर्जफेड, विविध सेवा, आगाऊ रकमा, महानगरपालिका, सरकारी कंपन्या, राज्य सरकार यांना मंजुरी दिलेली कर्जे इत्यादींचा समावेश यात असतो.

सर्वसाधारणपणे आपण अंदाजपत्रकाची आत्तापर्यंत रूपरेषा पाहिली. यामध्ये आपण महसुली अंदाजपत्रकातील महसुली प्राप्ती आणि महसुली खर्चात तसेच भांडवली अंदाजपत्रकात भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांत कोणत्या बाबींचा समावेश असतो या गोष्टींचा तपशील घेतला आहे त्यानंतर आपण अंदाजपत्रकाचे कोणते प्रकार असतात ते पाहुयात.

सरकार देशातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सकारात्मक प्रयत्नांच्या माध्यमातून काम करत असते. सरकार जनतेच्या कल्याणासाठी अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे अंदाजपत्रक तयार करत असते. अंदाजपत्रक ही अशी प्रक्रिया आहे, ज्याच्या सहाय्याने विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी सरकार सार्वजनिक साधनसामग्रीचे नियोजन आणि नियत्रंण करते. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनाने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण, मानवी आणि भौतिक साधानसामग्रीचा वापर यावर घडून येतो.

त्यामुळे सरकार अंदाजपत्रकाची विभागणी करत असते या शासकीय अंदाजपत्रकाचे तीन प्रकार पडतात. शिलकीचे अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक.

याविषयी थोडक्यात समजून घेऊयात.

१) शिलकीचे अंदाजपत्रक: जेंव्हा सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते त्याला शिलकीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. आर्थिक तेजीच्या काळात हे अंदाजपत्रक उपयोगी ठरते.

२) समतोल अंदाजपत्रक : समतोल अंदाजपत्रकात सरकारचे महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च हे दोन्ही घटक समान असतात. त्याला संतुलित अंदाजपत्रक म्हणतात.

३) तुटीचे अंदाजपत्रक : जेव्हा सरकारची प्राप्ती किंवा उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते. त्यामुळे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हे अंदाजपत्रक आर्थिक मंदीच्या काळात उपयोगी ठरते.

भारतात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते. कारण भारत हा देश विकसनशील देश आहे. विकसनशील देशात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते कारण देशांतर्गत रोजगार कमी असतो, कमी उत्पन्न असते, गुंतवणूक कमी असते, मागणी कमी असते इ बाबींची कमतरता असल्यामुळे सरकारने जास्तीचा खर्च करून आर्थिक करावा आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवावी अशी अपेक्षा सरकारकडून असते त्यामुळे या अंदाजपत्रकाचा स्वीकार विकसनशील राष्ट्रे करताना दिसतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:04 ( 1 year ago) 5 Answer 6963 +22