लोकसंख्येचा मनोरा एखाद्या देशाची लोकसंख्या शास्त्र कसे स्पष्ट करतो?www.marathihelp.com

लोकसंख्येचा मनोरा एखाद्या देशाची लोकसंख्या शास्त्र कसे स्पष्ट करतो?

लोकसंख्येचा अभ्यास करण्याचे विविध घटक आहेत आणि या घटकांपैकी लोकसंख्येचे वय आणि लिंग रचनेप्रमाणे वर्गीकरण करून केलेला अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकतो.मानवी लोकसंख्येत विविध वयोगट असतात. ज्यामध्ये नवजात अर्भक, शिशु, बालक, कुमार, युवक, प्रौढ, वृद्ध आणि अतिवृद्धि लोकांचा समावेश होतो. अर्थात, हे वयोगट अगदी ढोबळ आहेत. अभ्यासाच्या दृष्टीने लोकसंख्येचा अभ्यास करताना हे वयोगट एका विशिष्ट पद्धतीने पाडले जातात. रचना ही सर्वसाधारणतः ०-५, ५-१०, १०-१५, १५-२०, २०-२५ अशाप्रकारे १०० वर्षांपर्यंत विविध गटांमध्ये केली जाते. प्रत्येक वयोगटातील लोकांची संख्या जर एका आलेखाद्वारे व्यक्त केली, तर जी रचना प्राप्त होते त्याला 'लोकसंख्येचा मनोरा' म्हणतात.प्रत्येक वयोगटात त्यापुढे पुरुष आणि स्त्रिया असे वर्गीकरण करून जेव्हा असा मनोरा तयार केला जातो, तेव्हा त्याला 'लोकसंख्येचा वय लिंग मनोरा' म्हणतात. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील पुरुषांचे आणि स्त्रियांचे प्रमाण संख्या किंवा टक्केवारी या स्वरूपात कळते.लोकसंख्येच्या वय-लिंग मनोऱ्याच्या आधारे एखाद्या देशाचे किंवा प्रदेशाचे लोकसंख्येचे जन्मदर व मृत्युदर आणि इतर वैशिष्ट्ये समजतात. लिंग मनोऱ्याचे साधारणतः तीन प्रकार आढळून येतात : (१) विस्तारणारा वय-लिंग मनोरा (२) संकोचणारा वय-लिंग मनोरा आणि (३) स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा.विस्तारलेला मनोरा जास्त जन्मदर आणि जास्त मृत्युदर दर्शवतो. त्यामुळे एकीकडे १० ते १५ या वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची टक्केवारी जास्त असल्याचे या मनोऱ्यावरून कळते. मात्र, त्याच वेळेस ६० व त्यावरील अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तींचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या प्रदेशाचा मृत्युदर जास्त असल्याचेही समजते. थोडक्यात, हा मनोरा एखाद्या विकसनशील देशाचा लोकसंख्या वय लिंग मनोरा असल्याचे सहज समजून येते.याउलट, स्थिरावलेला किंवा संतुलित वय-लिंग मनोरा हा कमी जन्मदर तसेच कमी मृत्युदर ही दोन वैशिष्ट्ये ठळकपणे दर्शवतो. प्रत्येक वयोगटात पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येत एक समानता आढळते आणि त्याच वेळेस जन्मदर कमी म्हणून ० ते १५ वयोगटातील अवलंबित लोकसंख्येची संख्या कमी आणि मृत्युदर कमी त्यामुळे ६० व त्यावरील अधिक वयाच्या लोकांच्या संख्येचे प्रमाण जास्त ही दोन ठळक वैशिष्ट्ये दिसतात. त्याच वेळेस १५ ते ५९ या वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण ह्या देशात जास्त असल्याचे दिसते. एकंदरीत कमी मृत्युदर म्हणजे उत्तम वैदयकीय सेवा-सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम राहणीमान या गोष्टी दिसून येतात. कमी जन्मदर म्हणजे शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती दर्शवते आणि त्याच वेळेस कार्यशील लोकसंख्येचे चांगले प्रमाण हे आर्थिक विकासाचा दर्जा दर्शवते.वय-लिंग मनोऱ्यातून एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या लाभांश याबद्दलही माहिती समजून येते. विस्तारलेला मनोरा हा आज जरी अवलंबित लोकांची संख्या जास्त असल्याचे दाखवत असला, तरी अशा प्रदेशात भविष्यकाळात लोकसंख्या वृद्धिदर कमी होऊन म्हणजेच, जन्मदर कमी होऊन कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाऊन त्याचा फायदा त्या देशाला लोकसंख्या लाभांशाच्या स्वरूपात मिळतो हे अनेक बाबतीत दिसून आलेले आहे. विस्तारणाऱ्या देशाचा वय-लिंग मनोरा हा पुढे संतुलित मनोऱ्यात परावर्तित होतो. या स्थित्यंतरादरम्यान जन्मदर कमी होते, शिक्षणाचा दर्जा वाढतो, प्राथमिक व्यवसायाबरोबरच द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसायांचे प्रमाणही वाढते. पायाभूत सेवा सुविधा, उदयोग, सेवाक्षेत्र यांचा विस्तार होतो. रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतात, राहणीमान सुधारते, वैद्यकीय सेवा सुविधा वाढतात आणि त्यामुळे हळूहळू मृत्युदर कमी झाल्यामुळे ६० व त्यावरील लोकांचे प्रमाण वाढत जाते. या एकूण आर्थिक-सामाजिक विकासाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ त्या देशातील किंवा प्रदेशातील सर्व लोकांना विकासाच्या स्वरूपात मिळतो त्यालाच लोकसंख्येचा लाभांश म्हणतात.थोडक्यात, लोकसंख्येच्या वयरचनेच्या अभ्यासामुळे लोकसंख्येतील अवलंबित लोकांचे प्रमाण, कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण, वृद्धांचे प्रमाण, आर्थिक विकासाचा स्तर, लोकसंख्या लाभांशाचे स्वरूप आणि लिंग गुणोत्तर अशा विविध घटकांचा अभ्यास लोकसंख्या वय रचनेतून करता येतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:20 ( 1 year ago) 5 Answer 3687 +22