वसाहतवाद म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

वसाहतवाद :

आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात.
वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. दुसऱ्या प्रदेशात वा देशात वसती केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश व्यापणे अथवा त्या प्रदेशातील लोकांत आपला संघटित गट करून आपले वर्चस्व प्रस्थापिणे, ही पुढची प्रक्रिया होय. या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवृत्ती म्हणतात. या प्रवृत्तीत समर्थ देशाने आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वर्चस्व दुसऱ्या प्रदेशावर लादणे अंतर्भूत असते. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाचे स्वरूप विस्तृत व सर्वंकष झाले आणि त्याची परिणती नवसाम्राज्यवादात झाली. औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या यूरोपीय राष्ट्र-राज्यांनी व्यापारी बाजारपेठांसाठी मागासलेल्या व अविकसित वसाहतींवर राजकीय, आर्थिक, लष्करी वर्चस्व लादणे, ही अनिवार्य गोष्ट झाली. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतरचा वसाहतवाद आर्थिक दृष्ट्या शोषक, राजकीय दृष्ट्या जुलमी, सामाजिक दृष्ट्या अनुदार व सांस्कृतिक दृष्ट्या असहिष्णू बनला.

वसाहतवादाचे स्वरूप : वसाहतीकरणानंतर वसाहतीतील प्रजेवर मातृदेशातील लोकांनी, विशेषतः सत्ताधीशांनी, आपली जीवनपद्धती तेथील लोकांवर लादण्याचा सातत्याने प्रयत्‍न केला आणि त्यांनी असा आभास निर्माण केला की, आपली संस्कृती वसाहतीतील मूळ संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे. काही वसाहतवाल्यांनी वसाहतीतील मूळ लोकांवर धर्मांतराची सक्ती केली. या संदर्भात पोर्तुगालचे उदाहरण अगदी बोलके आहे. काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी वसाहतीतील लोकांवर आपल्या भाषेची सक्ती केली. वसाहतींच्या भौतिक विकासासाठी वसाहतवाल्यांनी रेल्वे आणली, जुने रस्ते दुरुस्त केले, नवीन रस्ते खोदले, भव्य वास्तू बांधल्या आणि कारखाने सुरू करून वसाहतीत औद्योगिकरणास उत्तेजन दिले शाळा काढून शिक्षणप्रसारास प्रोत्साहन दिले दवाखाने उघडून लोकांच्या औषधोपचारांची व्यवस्था केली. या सर्व सुधारणांमागे त्यांचा हेतू मूलतः वसाहतीतील सामान्य लोकांची सहानुभूती मिळवून राजकीय सत्ता दृढतर करणे, हा होता. तीच बाब आर्थिक धोरणात त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणली. लोकांचे कल्याण व्हावे, यापेक्षा संपत्तीचा ओघ मातृदेशात कसा जाईल, यावर त्यांची दृष्टी खिळली होती. म्हणून वसाहतीतील मजुरांचे श्रम ते जवळजवळ वेठबिगारीने घेत. 

 औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवादाची झपाट्याने वाढ झाली आणि नव-साम्राज्यवादाबरोबर यूरोपमध्ये व्यापारवाद (मर्कटिलिझम) ही आर्थिक पद्धत रूढ झाली. या पद्धतीनुसार पाश्चात्त्य राष्ट्रे आपल्या वसाहतींतील अर्थव्यवस्था आपल्या व्यापाराला कशी उपयुक्त होईल, या दृष्टिकोनातून पाहू लागली आणि त्यानुसार आर्थिक संयोजन करू लागली. ग्रेट ब्रिटनने या दृष्टीनेच अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत आपल्या व्यापारास अनुकूल असे अनेक कायदे वसाहतींत केले. त्याला अनुसरूनच वसाहतींनी कच्चा माल पुरवावयाचा आणि तयार झालेला पक्का माल विकत घ्यावयाचा, अशी पद्धत रूढ झाली. जणू हा विधिलिखित संकेतच ठरला. परिणामतः वसाहती या हक्काच्या व्यापारपेठा बनल्या. गुलामगिरी हाही यातील एक फार मोठा भाग होता. म्हणून दक्षिण अमेरिकेतील वसाहतीत यूरोपियनांनी प्रथम तेथील इंडियन लोकांना कापसाचे उत्पन्न वाढविण्यासाठी व इतर कच्च्या मालाकरिता विविध मळ्यांवर (प्लॅटेशन्स) कामास सक्ती केली. पुढे त्यांनी आफ्रिकेतून काही गुलाम या कामासाठी आणले. त्यातून एकोणिसाव्या शतकात गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभी राहिली. पुढे ब्रिटिशांच्या हे लक्षात आले, की प्रचलित व्यापारवादामुळे काही धंद्यांवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा त्यांनी मुक्त व्यापाराचे धोरण अवलंबिले. त्यामुळे आपाततःवसाहतीतील व्यापारावरील निर्बंध शिथिल करण्यात आले. ग्रेट ब्रिटनचे अनुकरण अन्य काही पाश्चात्त्य राष्ट्रांनी केले परंतु या धोरणामुळे आफ्रिका-आशिया खंडांतील वसाहतीकरणास आळा बसला नाही व कच्चा माल पुरविणे आणि तयार माल विकत घेणे, ही अवस्था तशीच काही प्रमाणात चालू राहिली. याशिवाय यूरोप खंडातील धनाढ्य लोक, उद्योगपती, बॅंका यांनी वसाहतींतील खाणी, कारखाने, चहा-कॉफीचे मळे, निळीचा उद्योग, रेल्वे उद्योग, जहाजबांधणी उद्योग इत्यादींत भांडवल गुंतवून त्यांतून नफा मिळविण्यास प्रारंभ केला. त्यामुळे साहजिकच वसाहतींतील पैशाचा ओघ मातृदेशाकडे वाहत राहिला. 

वसाहतींतील राजकारणात वैविध्य आढळते. काही अधिसत्ता गाजविणाऱ्या राष्ट्रांनी वसाहतींना स्वातंत्र्य दिले तर काहींनी वसाहतीचे स्वराज्य (डोमिन्यन स्टेटस) मान्य केले. प्रत्येक यूरोपीय राष्ट्राची याबाबतची भूमिका भिन्न होती.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 6935 +22