चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवा : शासनाचे पतंजलीला आदेश

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

पतंजलीकडे  कोरोना विषाणूवर आयुर्वेदिक औषध आहे. या औषधाने कोरोनासंक्रमित रुग्ण ७ ते १४ दिवसात बरा होऊ शकतो, असा दावा पतंजलीचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी आज ‘कोरोनिल’ नावाचे औषधही बाजारात आणले असून, त्याची विक्री आणि जाहिरात सुरू केली. मात्र केंद्र सरकारने कोरोनावरील या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिल्याने पतंजलीला काही तासातच धक्का बसला आहे.

हरिद्वारच्या पतंजली योगपीठात काल कोरोनाचे आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ (Coronil) विक्रीसाठी उपलब्ध करण्याचे जाहीर करण्यात आले. हे औषध बाजारात आल्यानंतर पतंजलीने त्यांची जाहिरात आणि विक्री करायला सुरूवात केली. तसेच, हे औषध घरपोच पोहोचवण्यासाठी मोबाईल अनुप्रयोग आणण्याची तयारी पतंजलीकडून सुरू असतानाच केंद्र सरकारकडून पतंजलीला केंद्रशासनाने नवे आदेश दिले आहेत. “या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी”, असे आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

गिलोय आणि अश्वगंधा कोरोनाची साखळी तोडण्यात 100 टक्के प्रभावी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधून काढल्याचा दावा केला होता. त्यानंतर काल हे औषध लाँच केल्यानंतर “संपूर्ण देश आणि जग ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होता, तो क्षण आता आला आहे. पतंजलीने कोरोनावरील पहिलं आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. या औषधाच्या मदतीने आम्ही कोरोनाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीवर नियंत्रण ठेवू शकू” असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. तसेच,  “या औषधाच्या साहाय्यानं तीन दिवसांच्या आत ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत, तर ७ दिवसांमध्ये १०० टक्के रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या औषधाची चाचणी २८० जणांवर करण्यात आली,” असंही ते म्हणाले.

ब्रेनविश्लेषण : ‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?

दुसरीकडे, देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगभरात ‘कोव्हिड-१९’वर औषध शोधण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  त्यामुळे आता पतंजलीने शोधून काढलेले हे औषध कोरोना रुग्णांवर खरेच प्रभावी ठरणार का, हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here