या वर्षाअखेरीस दोन रेल्वे स्थानके होणार जागतिक !

भारतीय रेल्वेने गांधीनगर आणि हबीबगंज रेल्वेस्थानकांना विमानतळ शैलीदेऊन जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचे ठरवले आहे. यासाठी ‘भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ’ या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम करणार आहे

 

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली

भारतीय रेल्वे लवकरच विमानतळ शैलीतील जागतिक दर्जाच्या दोन रेल्वे स्थानकांची निर्मिती करत असून, या वर्षाअखेरीस या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे पूर्ण होणार आहेत. याअंतर्गत ‘भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळ‘ (Indian Railway Stations Development Corporation) गुजरातमधील गांधीनगर आणि मध्यप्रदेशातील हबीबगंज या ठिकाणी रेल्वेस्थानकांच्या उभारणीचे काम करत आहे. यावर्षीच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२० च्या अखेरीस या दोन्ही रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण होणार असून, केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्त्वात भारतीय रेल्वे या स्थानकांची उभारणी करत आहे, अशी माहिती रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी दिली.

भारतीय रेल्वेच्या या पुनर्विकासाच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देताना यादव म्हणाले की, पुनर्विकासाचे काम पूर्ण झाल्यानंतर हबीबगंज रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काचेची घुमटाकार रचना असेल. या अत्याधुनिक रेल्वे स्थानकात विमानतळाप्रमाणे किरकोळ दुकाने (रिटेल आउटलेट्स), खाद्यपदार्थांची दुकाने (फूड कॅफेटेरियस), अलिशान कोच (प्लश वेटिंग लाऊंज), आधुनिक शौचालये ( मॉडर्न  टॉयलेट्स) अशा विविध सुविधा  प्रवाशांसाठी असणार आहेत. सोबतच, या स्थानकात जागतिक दर्जाचे गेमिंग झोन आणि संग्रहालयेही असतील. शिवाय बाहेर पडताना सुटसुटीत गर्दी न होणारे फलाटही विकसित केले जातील.

हेही वाचा : रेल्वेने जाहीर केली महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे ; जाणून घ्या सर्वकाही

सोबतच, हबीबगंज रेल्वे स्थानकाची संपूर्ण इमारत ही पर्यावरणपूरक असेल. यात उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे, कचरा आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पदेखील असतील. त्याचबरोबर प्रवाशांना विश्रांतीसाठी एक पॉड हॉटेलची उभारणीही केली जात आहे.

दुसरीकडे, गांधीनगर रेल्वे स्थानकाबाबत सांगायचे झाल्यास भारतात पहिल्यांदाच रेल्वे रुळाच्या वर एक पंचतारांकित हॉटेल असेल, जे लीला ग्रुप्समार्फत चालवले जाईल. या वर्षा अखेरीस या रेल्वे स्थानकाचेही काम पूर्ण होईल. या अत्याधुनिक स्थानकाच्या इमारतीचा परिसर मोठमोठी खाद्यपदार्थांची दुकाने, शॉपर्स स्टॉप, बिग बाजार यांसारख्या दुकानांचा समावेश असणारा भव्य असा असेल. त्याचबरोबर, या स्थानकात ६०० प्रवाशांच्या आसनव्यवस्थेसह भव्य हॉलचीही उभारणी करण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त, “येत्या काही वर्षांत देशात अशाच दुसऱ्या नवी भव्य आधुनिक रेल्वे स्थानकांची उभारणी केली जाईल”, असे यादव यांनी सांगितले.

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here