गाडी चालवताना मोबाईल वापरणार, तर परवाना रद्द होणार!

मराठीब्रेन वृत्त

मुंबई , १९ नोव्हेंबर

गाडी चालवताना चालक मोबाईलवर बोलताना किंवा हाताळताना आढळल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाणार असल्याचे परिपत्रक राज्य वाहतूक विभागाने आज जाहीर केले आहे.

दरदिवशी होणाऱ्या अनेक वाहतूक अपघातांमुळे लोकांना जीव गमवावे लागत असल्याच्या घटना आपण बघत असतो. त्या अपघातांच्या कारणांपैकी गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, हे एक मुख्य कारण आहे. वाहतूकीमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी आता शासनाने एक नवे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार वाहन चालवताना कुणी मोबाईलवर बोलत असल्याचे किंवा मोबाईल हाताळत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीचा वाहन चालक परवाना रद्द केला जाणार आहे. हा परवाना तीन महिन्यांसाठी वाहतूक नियंत्रण विभागाद्वारे रद्द केला जाणार आहे.

वाहतूक विभागाने जारी केलेल्या या परिपत्रकात बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत वाहन चालवताना कुणी मोबाईल हाताळताना किंवा मोबाईलवर बोलताना दिसल्यास चालकांवर दंड आकारले जात होते. मात्र, या दंडात्मक कारवाईमुळे वाहतूक व्यवस्थापनाला निर्धारित उद्देशांमध्ये योग्य ते यश मिळाले नाही. निर्धारित दंड भरून वाहनचालक मोकळे होत होते. मात्र, आता थेट परवाना रद्द होणार असल्याने शासनाचा या निर्णयाचा कुठे पुरस्कार, तर कुठे याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्ते परिवहन विभागाच्या (आरटीओ) माहितीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात १६ हजार रस्ते अपघात झाले होते, त्यांमध्ये १२ हजार २०० लोकांना जीव गमवावा लागला आहे. शासनाने जारी केलेला हा नवा निर्णय वाहतूक अपघातांना आळा घालण्यात कितप यशस्वी होईल, हे बघणे आता महत्त्वाचे आहे.

◆◆◆

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here